Monday 16 June 2008

वामांगी

देवळात गेलो होतो मध्ये
इथे विट्ठल काही दिसेना
रख्माय शेजरी नुस्ती वीट

मी म्हणालो
रख्माय तर रख्माय
कुणाचा तरी पायावर डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला,दिसत नाही.

रख्मा म्हणाली
कुठं गेला म्हणजे?
उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला?

मी परत पाह्यलं
खात्री करून घ्यायला
आणि म्हणालो
तिथं कुणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा कमीच दिसतं

दगडासारही झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडे जर होत नाही.

कधी येतो कधी जातो
उठं जातो काय करतो
मला आही काही माहीत नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजुला असे विठू
म्हणून मी बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही?

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
आट्ठावी युगांचं एकटेपण!

अरूण कोलटकर

No comments:

Post a Comment