Wednesday, 24 September 2008

Marathi Kavita : एक स्वैर नभ

एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता,
काय जाणे माझा पत्ता
त्याने कुठुन मिळवला होता
आकाशातल्या विजेवरती
त्याचा जिव जडला होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता.


तिच्या मोहक स्वैर वावरावर
तो फ़िदा झाला होता
वाहत्या वा-याची BMW घेऊन
तो धरतीवर पोहोचला होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता.


बसला तो माझ्याशेजारी अन
मनातली गुपीते सांगत होता
हळुच आठवुन त्या सौदामिनीला
डोळ्यांतुन टिपे गाळत होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता


बनला दुत कालीदासाचा निरोप पोहोचवण्यासाठी
पण आता हतबल झाला होता
त्या दामीनीचा पत्ता
त्याला कुठे माहीत होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता


शेवटी मी सांगीतला ठावठिकाणा तिचा
तो अल्लड पोरासारखा हसला होता
गेला निघुन आला तसाच
त्यांचा मिलनाचा सोहळा मात्र
मी पाऊस पडताना पाहीला होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता
एक स्वैर नभ काल माझ्याकडे आला होता


No comments:

Post a Comment