Friday, 14 February 2014
बाबा रिटायर होतोय
बाबा रिटायर होतोय
आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.
आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,"मी आता रिटायर होतोय, मला आता नवीन कपडे नको, जे असेल ते मी जेवीन, जे असेल ते मी खाईन, जसा ठेवाल तसा राहीन."
काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं, आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच तुटावं, अगदी तसं झालं. एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.
का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ? मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ? तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल, कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही,"काय हवं ते करा माझी तब्बेत बरी नाही, मला कामावर जायला जमणार नाही."
खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा, पण तो काकुळतीला का आला? ह्या विचारातच माझं मनं खचलं. नंतर माझं उत्तर मला मिळालं, जसा जसा मी मोठा होत गेलो, बाबाच्या कवेत मावेनासा झालो. नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं, त्याबरोबर वाढत होता तो अहंकार, आणि त्याने वाढत होता तो विसंवाद, आई जवळची वाटत होती, पण बाबाशी दुरावा साठत होता.
मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं, पण ते शब्दात सांगताच आलं नाही, बाबानेही ते दाखवलं असेल, पण दिसण्यात आलं नाही. मला लहानाचा मोठा करणारा बाबा, स्वःताच स्वतःला लहान समजत होता. मला ओरडणारा - शिकवणारा बाबा, का कुणास ठाऊक बोलताना धजत होता.
मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला, शरीर साथ देत नव्हतं, हे त्या शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला, घरात नुसतं बसू देत नव्हतं. हे मी नेमकं ओळखलं.
खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून, सांगायचच होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ आता”. लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा, मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा, आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा, आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता, जेव्हा खुर्चीत शांत बसतो, तेव्हा वाटतं कि काही जणू आभाळंच खाली झुकलं.
आज माझंच मला कळून चुकलं.
कवि : __________
Subscribe to:
Post Comments (Atom)
Khup sunder kavita.....
ReplyDeleteKhup chan kavita........
ReplyDelete