Wednesday 28 May 2014

Marathi Kavita : अंधार ..!!!

मी विकत घेईन म्हणतोय हा अंधार ..!!
आजकाल काहीही होत असते
दारावर आलेला सेल्समन म्हणत असतो
साहेब,घ्यायचा का अंधार..?
फार स्वस्त लावलाय
तुम्हाला म्हणून मी स्वस्त देतोय
फक्त शंबर रुपयात
अगदी स्वस्त विकतोय...

साहेब अंधार आजकाल मिळतोय कोठे ..?
उजेड तर डोकावीत असतो फटीतून
कधीही केव्हाही
रात्री देखील अंधार नसतो
कोठेतरी लपून बसतो
अंधाराला भोके पडलीत उजेडाची
अंधाराचे फुटके टमरेल
कसा उजेड गाळत असतो ....

माझ्या आठवणीतला अंधार
खूप विरळ होऊन गेलाय
मी सावली विकत घेणार नाही
कारण..?
सावलीला असतात हात-पाय
नि भुताचा आकार
सावलीपेक्षा अंधार बरा वाटतो
अंधार असला तरी मला आपला वाटतो
मला हवाय शप्पत काळाभोर गच्च अंधार
क्षणभर हरवून जायचेय ह्या अंधारात
आणि बघायची दिसतील ती भुते
जी माझ्याच मनात लपून बसली आहेत

आणि नेमका
सेल्समन म्हणत असतो
साहेब घ्याना हा अंधार
फार स्वस्त आहे
तुम्हाला म्हणून स्वस्तात देतो
फक्त शंभर रुपयात.....
मी विकत घेईन म्हणतोय हा अंधार ..!!


कवि : प्रकाश

No comments:

Post a Comment