Tuesday, 29 July 2008

सरळ हो म्हण अन हो मोकळी...

जरा कुठे लागताच माझी चाहूल
उभी असतेस पडद्यामागे वेळी-अवेळी
माझ्या गच्चीकडे पहात परवा
डहाळीच तोडलीस समजून चाफ़ेकळी

तु किती जरी नाही म्हणाली
माझी स्वप्न छळतात तुला रात्रवेळी
लालबुंद अवजड डोळे तुझे
खरी कहाणी सांगतात मला सकाळी

माझ्या सादेची प्रतीक्षा म्हणजे
हाही वसंत सुका जाणार का ग मुली
मी हा असा मुखदुर्बल अबोल
स्वतः होऊन बोलणार आहे का मुळी

जरी आमचा अटकेपार झेंडा
राजसभेत मारे ढाण्या वाघाची डरकाळी
पण कसं अन कुणास ठावूक,
तू समोर दिसताच, होतो आम्ही शेळी

पृथ्वीराजानं या संयुक्तेला वरावं
असेल जरी तुझी ही मनिषा साधीभोळी
शिव-धनुष्य मला कसं पेलावं
जन्म आम्ही थोडाच घेतलाय रामकुळी

नलानेच घालावी दमयंतीस
मागणी, जनरीत असेलही पुराणकाळी
धिर करुन तुच घ्यावा पुढाकार
करावेत असे अपवाद कधीच्या काळी

वाचतेस ना माझी नयन-भाषा
इतकीच कशी ग तू वेडी अन खुळी
होकाराला नाही शब्दांची गरज
फ़क्त घाल ती वरमाला माझ्या गळी

किती काळ तु स्वतःलाच
विनाकारण जाळणार आहेस ग मुली
सरळ हो म्हणून टाक म्हणजे
कसं,मीही मोकळा अन तुही मोकळी

-- भूपेश

1 comment: