Monday, 21 July 2008

चारोळ्या Charolya

1) सगळे दिवे मालवले तरी
एक दिवा राहून जातो
आणि पहाटे आधी कोणीतरी
तो तेवता दिवा पाहून जातो

2) आभाळभरून येतं तेव्हा कळत नाही
ते कुठून येतं
मला वाटतं कुणाचं तरी ते
कोंडलेलं मन फुटून येतं

3) कधी कधी मला वाटतं
मी अजरामर असेन
झाली आता जगबुडी तर
पुन्हा तुमची वाट बघत बसेन

4) एक पाऊल उचललं की
दुसरं जमिनीवर टेकवावं लागतं
चालणं सुध्दा माणसाला
सुरवातीला शिकावं लागतं

5) वाहून गेलेल्या घरापुढे
राहून गेलेली तुळस आहे
आणि उंच डोंगरावर, देउळाचा
निर्विकार कळस आहे

6) मरायचा अभिनय करता येतो
जगायचा करता येत नाही
मेलेल्याला माणसासारखं
गृहीत धरता येत नाही

7) जसे आपण जगत जातो
तसं आयुष्य सरत जातं आणि
आपण सोडलेल्या, गाळलेल्या जागा
ते नाईलाजानं भरत जातं

8) पहाटे जवळ दोन्ही असतं
काळोख आणि प्रकाश
प्रकाशाला मी मोकळ करते
काळोख गिळत राहते सावकाश

9) दिवस शहाणा असतो
रात्र वेडी असते आणि
पहाटेजवळ वेडेपणाची
रंगलेली गोडी असते

10) सुरुवात कुठून करायची हा प्रश्न
मला सुरुवातीला पडतो
भूतकाळ आठवायचा तर
प्रवास उंबरठयाशी अडतो

11) तुला आठवताना मला
एक भान राखावं लागतं
असं देहाचं उजळणं
काळोखात झाकावं लागतं

12) वा-याची झुळुक रानात
झुलताना दिसली
तू कोण? विचारलं तर
ती अगदी तुझ्यासारखी हसली

13) तू हाक मारलीस तर
मला मागे परतायला जमेल
पण प्रश्न हा आहे की...
तुला हाक मारायला जमेल ?

14) तू म्हणशील तसं
हे माझं ब्रीद वाक्य आहे
आणि लोकांना वाटतं
आपल्या दोघात ऐक्य आहे

No comments:

Post a Comment