ट्रिंग ट्रींग फ़ोनने आपण जिवंत असल्याची घोषणा केली आणि वैतागत हातातले मासिक टाकत निशांतने फ़ोनला हात घातला. 
  
  " कोण"? त्याच्या आवाजातला वैताग जाणवत होता. 
  
  " मी स्वप्ना बोलतेय". पलिकडून उत्तर आले. 
  
  " कोण स्वप्ना" 
  
  " अरे स्वप्ना, स्वप्नाली तुझी मैत्रिण"! 
  
  " अरे स्वप्ना तु? इतक्या दिवसांनी नाही वर्षांनी फ़ोन करतेयस? कुठे होतीस इतके दिवस विसरलीस की काय मला?"
  
  अरे हो! हो! किती प्रश्न एकदम विचारतोस, तुला माहिताय ना माझ्या पपांच्या बदलीनंतर आम्ही सगळेजण बंगलोरला गेलो". 
  
  " ते माहीताय गं मला पण त्या नंतर तु माझ्याशी संपर्कच ठेवला नाहीस ईतक्या दिवसांची दोस्ती एकदम कचरापेटीत टाकलीस"
  
  "चिडतो काय रे? तु आजिबात बदललेला नाहीस इतक्या इतक्या गोष्टीवरुन आजुनही चिडतोस वाटतं!" 
  
  "ही इतकीशी गोष्ट? अगं आपले एकमेकांशिवाय पान नव्हते हलत, एकत्र लेक्चर  बंक केली, एकत्र कॅंटीनची बिलं वाढवली तुला आठवतं तो भट आपल्याला मेगा  कस्टमर म्हणायचा?" 
  
  "सगळं आठवत रे! फ़क्त आठवणीच उरल्यात आता". 
  
  " का गं स्वप्ना काय झालं तुझा आवाज असा उदास का?" 
  
  " नाही रे उगीच आपलं"
  
  " हे बघ स्वप्ना तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखतो काहीतरी बिनसलय नक्की पपा काही बोलले का आत्ता फ़ोन केल्यावरुन" 
  
  "नाही रे ! " 
  
  " मग नक्कीच ममा रागाने बघत असेल तुझ्याकडे तिला मी आवडत नव्हतोच, तुझा  मित्र व्हायची लायकी नव्हती माझी असं नेहमीच म्हणायची ना ती?" 
  
  " अरे कुणी काही म्हणत नाहीये! तुझा राग करणारी ममा आणि सारखे शहर बदलणारे  पपा आता या जगात नाहीयेत दोन वर्षांपुर्वीच कारच्या अपघातात गेले दोघेही" 
  
  " ओऽह सॉरी पण तु अशी रडतेस कशाला? आणि आत्ता आहेस कुठे?" 
  
  " मी रडत नाहीये आठवण आली रे फ़क्त त्यांची, मी आता तुझ्याच शहरात आलेय रहायला घरुनच बोलतेय" 
  " आणि तुला माझा न.बर मिळाला तरी कसा?" 
  
  " ती एक गंम्मतच आहे तो आपला पोटू आठवतो का? तो माझ्या ऑफ़िसच्या जवळ भेटला काल त्याच्याशी गप्पा मारताना मला तुझा नंबर मिळाला" 
  
  " हं आत्ता कशी हसलीस आता या बद्दल त्या पोटूला पार्टी द्यायला पाहीजे. आणि रहातेस कुठे आता?" 
  
  " रहायला कंपनीने फ़्लट दिलाय की, एकदम वेलफ़र्निशड आहे !" 
  
  " मग आता कोण कोण रहाता तिथे?" 
  
  "कळला कळला मला तुझा तिरकस प्रश्न, मी आजुन लग्न केलेलं नाहीये एकटीच रहाते! तु ही लग्न केलं नाहीयेस असं ऐकलं!"
  
  " होऽऽ तुझी वाट बघत होतो, तु आली नाहीस!" 
  
  " मग आता आले ना बोल कधी करतोयस लग्न? आणि तुला प्रेझेंट काय आणु"? 
  
  " खेचा, खेचा आमची तंगडी च्यायला तु मला म्हणतेस पण आजुन तु ही आहेस तशीच आहेस की!" 
  
  " गंम्मत केली रे तुझी, पण खरं सांगु ते फ़ुलपाखरी दिवस आता राहीले नाहीत  कॉलेज संपले आणि ते ही संपलेच, त्यावेळcया  आठवणी..........................................." 
  
  " का गं का गप्प झालीस पुन्हा रडायला लागलीस की काय?" 
  
  "नाही रे लाईट गेले इथले आणि मला आता भिती वाटायला लागलेय." 
  
  " हॅच्च च्या मारी आजुनही भित्री भागुबाईच का लाईट गेल्यावर घाबरुन लपणारी?" 
  
  " आता वाटते भिती त्याला औषध आहे का?" 
  
  " आहे की अधुन मधुन हॉरर पिक्चर पहात जा ड्रॅक्युला, द ममी सारखे"
  
  " निशु प्लिज हं आधी मला इथे भिती वाटतेय आणि त्यात तु मला आणखी घाबरवु नको हं" 
  
  " आता घाबरायच काय त्यात? म्हणजे बघ हं अंधार झाला ना की भुतं बाहेर पडतात इतकच" 
  
  " निशु गप्प बसशील का?" 
  
  " बघ म्हणजे मी गप्प बसेन पण मग एखादं भुत गप्प बसेल का? तुला एकटी बघुन?" 
  
  " निशुऽऽ आता जर विषय बदलला नाहीस तर मी फ़ोन कट करेन" 
  
  " बिंधास्त कट कर फ़ोन तु आता मी फ़ोनवर बोलतोय म्हणुन तरी निदान तु एकटी नाहीयेस पण फ़ोन कट केलास की तु एकटीच त्या काळोखात" 
  
  " निशु, माझ्या अंगाला घाम सुटतोय तु आता आणखी घाबरवु नकोस!" 
  
  " तु घाबरतेस कशाला? आणि घामच तर सुटलाय ना बघ हळूच एखादा हात येईल टॉवेल घेउन पुढे" 
  
  " निशु माझ्या छातीची धडधड वाढलेय " 
  
  " अगं भुतांमधे एखादे डॉक्टर भुत असेलच की ते तपासेल तुला" " आता विचार कर  रात्र तर आहेच लाईट गेलेले, रस्ते सुनसान, त्यातुन ईथला बराचसा भाग नुसता  ओसाड पडलेला, कुठे ना कुठे तरी एखादे स्मशान असेलच त्यात दिवसभर आराम करत  पडलेली सगळी भुतावळ आज आमावास्येच्या आधी आलेल्या या अकस्मीक सुटीमुळे खुष  झालेली असतील, ते सगळे आता एव्हाना सगळ्या काळोख्या भागात शिरलेही असतील,  त्यांना सगळीच घरं काही काळोखात असलेली सापडली नसणार त्यात पुन्हा काही  घरांच्या दारात देवाच्या मुर्ती आहेत म्हणजे तिथेही प्रवेश नाही मग राहीली  एकटी आणि असंरक्षीत घरं त्यातल्या त्यात फ़्लॅट कारण बिल्डींग बांधताना  बिल्डर काही जागेचा विचार करत नाही. मग सगळे मिळुन एखाद्या भित्र्या  माणसाच्या शोधात असतील, आणि बाहेर बघ कदाचीत एखाद्यावेळेस तुझ्या घरात  यायच्या तयारीत असतील सगळे बाहेर कुणाचे डोळे वगैरे तर चमकत नाहीयेत ना?"
  
  *********************
  
  "स्वप्ना!, स्वप्ना? अग आहेस की नाही तिकडे की घाबरुन फ़ोन टाकलास ?" 
  
  " ए स्वप्ना अगं किती घाबरतेस? एखादं भुत येइल तेंव्हा काय म्हणेल?" 
  
  " मी ऐकतेय तु बोलत रहा निशु" 
  
  " अरे स्वप्ना तुझी भिती गेली वाटतं आवाज एकदम बिंधास्त वाटतोय" 
  
  " आता मी आहेच बिंधास्त" 
  
  " बघितलसं एखाद्या माणसाची भिती घालवायला भिती घालणे हाच एक मस्त मार्ग आहे की नाही आता गेली की नाही तुझी भिती?" 
  
  "गेली की, आगदी कायमची! " 
  
  " पण आता तुला आणखी काय झालंय आवाज एकदम फ़्लट येतोय तो" 
  
  " काहीच नाही!" 
  
  " अरेच्च्या आज काहीतरी जोरदार भानगड झालेली दिसतेय इकडचे पण लाईट गेले"
  
  "आता तुझी पाळी" 
  
  "घाबरायची? छट आपण आजिबात भित्रा नाहीये तुझ्या सारखा, पण तु काही दिवा, मेणबत्ती लावलेयस की नाही नाही तर खरंच एखाद भुत यायच हो" 
  
  " त्याची आता काही गरज नाहीये!" 
  
  "आच्छा म्हणजे तिकडचे लाईट आलेले दिसतायत तरीच म्हंटल बाईसाहेब ईतक्या  बिंधास्त कशा बोलतायत"" एक मिनीट माझा शेजारी आलाय त्याच्याशी जरा बोलतोय  फ़ोन कट करु नको" 
  
  " काय साने इतक्या काळोखात? काय काम काढलेत" 
  
  "आधी मला सांगा निशांत तुम्ही फ़ोनवर कुणाशी बोलताय ?" 
  
  " माझ्या जुन्या मैत्रीणीशी हेच विचारायला आलात का " 
  
  " नाही हो शॉर्टसर्कीटमुळे पंधरा मिनीटांपुर्वी एक्चेंज बंद पडलेय म्हणुन  आपल्या सगळ्या एरियातले फ़ोन चलु नाहीयेत तुमच्या मोबाईलचे नेटवर्क चालु  आहे का ते विचारायला आलो होतो" " निशांत! निशांत असे काय करताय काही होतेय  का तुम्हाला? अहो असे छाती का आवळताय बाप रे अटॅक येतोय की काय? डॉकटरना  बोलावु का? आहो निशांतऽऽऽऽऽ.................................... 
  
  ******************
  
  "का गं स्वप्ना म्हणजे तु माझ्याशी बोलतानाच?........ " 
  
  " हो तु म्हणालास ना की मागे पहा म्हणुन तेंव्ह मागे पाहीले तर खिडकीत  खरंच डोळे चमकताना दिसले आणि मग सगळे शांत शांत!! मग कळाले की मागच्या  पारीजातावरचे काजवे चमकत होते ते" 
  
  " पण मग पुढचं कसं काय?" 
  
  " साधी गोष्ट आहे तुलाही माझ्या भितीची जाणीव करुन द्यायची होती त्याच  भावनेचा माझ्या अखेरच्या क्षणावर पगडा होता त्यामुळे बोलत राहीले अन काय  पण तु ईतका भित्रा निघशील असं नव्हत वाटलं" 
  
  " हो बंद फ़ोनवर इतकावेळ तुझ्याशी गप्पा मारल्यावर दुसरे काय होणार?" 
  
  आणि ते दोघे उठून चालायला लागले नदिकाठच्या स्मशानाकडे. 
  
  
Update :
  
मुळ कथेची लिंक http://www.maayboli.com/hitguj/messages/75/132293.html
 
Damn good man !
ReplyDeleteAwesome !
arrre khatarnak surprise hot te!!!
ReplyDeleteआपण प्रकाशीत केलेल्या या कथा यापुर्वी प्रकाशीत आहेत www.maayboli.com येथे, प्रकाशीत करण्यापुर्वी लेखकांची परवानगी घेतली नाही पण किमान त्यांचे श्रेय तरी त्यांना द्याल ?
ReplyDeleteही मुळ कथेची लिंक http://www.maayboli.com/hitguj/messages/75/132293.html
आशिष, तुमच्या सुचनेबद्दल मी तुमचा आभारी आहे. कथेच्या शेवटी मुळ कथेची URL टकली आहे.
Deleteमी इथे पोस्ट केलेल्या कोणत्याच साहीत्याचे श्रेय घेण्याचा प्रयन्त करत नाही, त्यांचे मी फक्त संग्रहन करतो.