Friday, 27 November 2009

Marathi Kavita : पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!

नकळत तुझं मित्रत्व
मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं
माझ्या भावनांचं विश्व
तेव्हाच विस्तारलं होतं

तुला रोज बघणं
आयुष्यातली एक सवय बनत गेली
तुझ्या फोनची वाट पाहण्यात
संध्याकाळ माझी विरत गेली

तू समोर आल्यावर
शब्द सारेच पळून जायचे
तू गेल्यावर मग मात्र
काय काय सांगायचं होतं
याची आठवण करून द्यायचे

तुझ्या पहिल्याच हास्यात मी
पूर्णपणे डूबायचे आणि
आपल्या मैत्रीच्या वेलीला
आणखीनच जपायचे

मैत्री एवढी सुंदर असते
हे तुझ्या रूपाने जाणवलं
मनाला मोहवणाऱ्या प्रत्येक
गोष्टीत त्या वेळी तुझंच रूप दिसलं

धबधब्यासारखे दिवस वाहत
राहिले असताना तुझ्या सहवासात
मैत्री नकळत मागे पडली
आणि एक प्रेमांकुर उमलला मनात

स्वभाव तुझा मी रोज
पडताळून बघायचे
रोजच्या बोलण्यात मात्र
नवीनच अनुमान निघायचे

तू दिसला नाहीस कधी
तर मेघ डोळ्यात उतरायचे
आणि घरी परत जाताना
मला चिंब भिजवायचे

परत दुसऱ्या दिवशी तू
त्याच गोड चेहऱ्याने हजर
सगळं विसरून पुन्हा तुला
बघायला आतुर असायची नजर

पण सुखाची चाहूल दुःख घेतं
तसंच काहीसं झालं
मैत्री आणि प्रेम मिश्रित हे
नातं एका गैरसमजामुळे विरत गेलं

कदाचित चूक नव्हती
दोघांचीही ,पण जिद्द
होती ना आपापला इगो मिरवण्याची

मनातली ठसठस जेव्हा
खूपच तीव्र झाली
मैत्रीने एक पाउल पुढे
टाकलं ,आणि मी माघार घेतली

हो , मी माघार घेतली
आणि इगो सोडून दिला
कारण तू दिलेल्या दुःखापेक्षा
मला तू स्वतः जास्त मोलाचा वाटला

तू सुद्धा मनातलं किल्मिष
काढून टाकलस
आणि हसून मी तुझ्या
सोबत आहे , हे
दाखवून दिलंस ....

आता तू असतोस सोबत
म्हणून मी स्वतःवरच खुश असते
रोजचीच संध्याकाळ आता
अजूनच छान दिसते

वाटतं एकदा सांगून टाकावं
मनातलं गुपित सारं
दुसरयाच क्षणी जाणवतं
समजल्यावर सगळं तू
अजूनच दूर गेलास तर ?


मला माहित आहे रे ,
तुझ्या पसंतीत मी
कुठेच बसत नाही ,
पण काय करू , मन
असं धावतं कि थांबतच नाही

एकदा हो म्हणून तर बघ ,
तुझ्यासाठी पूर्णपणे स्वताला बदलेन
तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी
उचलून फक्त फुलंच त्यावर पसरेन

मला तुला आयुष्यात
खूप सुखी झालेलं बघायचंय
रात्री झोपशील ना जेव्हा,
तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं
समाधानाचं हसू , हळूच
डोळ्यांनी टिपायचय

--
हर्ष

5 comments:

  1. Anil Sir,

    Tumchya Bhavan Samjalya Nahi eka Shabdaat. Savistar sangitale tar bare hoile...

    ReplyDelete
  2. kavita khup chan aahe.
    agdi manala bhavli.

    ReplyDelete
  3. poem is really awesome...i like it very much. i gave that to my sweetheart..
    thanks

    ReplyDelete