Tuesday, 21 December 2010

Marathi Kavita : अजिंक्या

कालच डॉक्टरकाका म्हणालेत,
घरी जायला हरकत नाही
मनासारखी धम्माल करायला
आता कसलीच अडचण नाही..

सकाळी जाग येईल आता
चिमण्यांच्या चिवचिवाटाने
रात्रीची चाहूल लागेल आता
रातराणीच्या मंद सुगंधाने..

आईने भरवलेली बासुंदी पुरी
छोटीने घातलेला सावळागोंधळ
बाबांनी केलेली थट्टा मस्करी
जोडीला याच्या मैत्रिणींचा घोळ..

एवढं सगळं छान होणार तरी
आईचा चेहरा का मलूल झालाय
बाबांचा हसण्याचा गडगडाटही
असा कुठेतरी हरवून गेलाय..

त्यांची ही मूकताच बोलकी होतेय
घरी जाण्याचे खरं कारणही
आता ही निःस्तब्ध शांतताच
नेमकी उलगडून सांगतेय..

त्यांना एवढेच सांगायचंय
आता सगळे सर्वार्थाने उपभोगायचंय
कणाकणाने खंगत मरण्यापेक्षा
क्षणाक्षणाने भरभरून जगायचंय..

अजिंक्य असा हा काळ
आ वासून समोर उभा ठाकलय
पण खंबीर, समाधानी मनाकडून
मात्र, कधीच पराभूत झालय...



-- मेधा

No comments:

Post a Comment