Sunday, 4 September 2011

Marathi Kavita : माझी राणी ....

पाखरू वेडे मन असे,
शोधीत फिरे तुलाच राणी ....
कधी आर्त साद घाली,
कधी तुझीच गाई गाणी ....

शांत शांत सूर हे नवे,
तुझेच ऐकू येती राणी ....
कधी सुरांची मैफल सजे,
कधी गुणगुण तुझीच कानी ...

दूर दूर नभ एक वेडा,
रूप दाखवी तुझेच राणी ....
कधी होई चित्रकार तो,
कधी मनास कुंचला मानी ....

खिडकीतला हा अवखळ वारा,
चाहूल तुझीच देतो राणी ....
कधी गंध तुझ्या तनुचा,
कधी तुलाच मिठीत आणी ....

पावसाची रिमझिम ओली,
चिंब करी तुला राणी ....
कधी ओला मी तुझ्यासवे,
कधी ओल्या जाणीवा मनी ....

चांदण्यांची रात्र सजली,
आठवणीत तुझ्याच राणी ....
कधी फुलते हसू ओठी,
कधी डोळ्यांत जमते पाणी ....

तूच तू एक तुझेच सारे,
तुझाच मी पण झालो राणी ....
कधी गुंतलो कसा कुठे,
कधी हरवलो न ठावे सजणी ....


कवि : रुपेश सावंत

1 comment: