Wednesday, 25 June 2008

जीमेल - ईमेल जोडी

गुगलची जीमेल आज आपल्याला जवळ जवळ ६ जीबी जागा मोफत देते. आपण जेव्हा जीमेलसाठी रजिस्टर करतो तेव्हा आपल्याला जीमेल डॉट कॉम ने शेवट होणारा ईमेल पत्ता मिळतो. xyz@gmail.com किंवा abc@gmail.com अशा प्रकारचे ईमेल पत्ते आपल्यापैकी हजारोंचे आहेत. पण त्या हजारोंपैकी फार कमी लोकांना हे माहीत आहे की ज्यावेळी आपल्याला gmail.com चा पत्ता मिळतो, त्याच वेळी गुगल आपल्याला आणखी एक ईमेल पत्ता देते. तो पत्ता

असतो googlemail.com चा. हे थोडं अधिक स्पष्ट करून सांगतो. समजा, तुमचा ईमेल पत्ता arun@gmail.com असा आहे. तर, त्याचा अर्थ गुगलने तुम्हाला arun@googlemail.com हा पत्ता तुम्ही न मागता gmail च्या जोडीने बहाल केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे गुगलच्या gmail.com आणि googlemail.com अशा दोन ईमेलच्या चाव्या आहेत. पण, तुम्ही वापरत असता तो फक्त gmail.com चा पत्ता. दुसरा googlemail.com चा पत्ता तुम्ही कधीच वापरत नाही. आपल्या उदाहरणाला चिकटून आपण थोडं आणखी पुढे जाऊ. समजा, तुमच्या arun@gmail.com ह्या ईमेल पत्त्याऐवजी तुमच्या मित्राने तुम्हाला arun@googlemail.com ह्या पत्त्यावर ईमेल पाठवली, तर ती तुम्हाला कुठे मिळेल? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. पत्ते gmail.com आणि googlemail.com असे दोन वेगवेगळे दिलेले असले तरी तुमचं अकाउंट एकच असतं. म्हणजे दोन्ही पैकी कोणत्याही पत्त्यावर तुम्हाला ईमेल पाठवली तरी ती येऊन पडते तुमच्या नेहमीच्याच gmail.com च्या अकाऊंट मध्ये.


Information By Madhav Shirvalkar

No comments:

Post a Comment